Friday, July 19, 2024

अर्थशास्त्र विषयातील करिअरच्या संधी (Career opportunities in Economics)

प्रा. योगेश भारस्कर
सहाय्यक प्राध्यापक (अर्थशास्त्र)
गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य
व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर, जि. नाशिक

अर्थशास्त्रातील करिअरसाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवीस्तरावर योग्य विषयाची निवड केली पाहिजे. कृषी अर्थशास्त्र, कृषिवित्त पुरवठा, सहकार, विकास व नियोजनाचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, आयात-निर्यात व्यापार, उपयोजित अर्थशास्त्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अर्थशास्त्र, श्रम-श्रमिकांचे अर्थशास्त्र, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, गुंतवणुकीचे अर्थशास्त्र, सार्वजनिक व्यापाराचे अर्थशास्त्र, इकॉनोमिट्रिक्स, सांख्यिकी अर्थशास्त्र या आणि अशा काही महत्त्वाच्या शाखांसह सुमारे २५ विषयशाखांचा अभ्यास मूलभूत अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. तसेच सद्यस्थितीतील समभाग बाजार, भांडवल बाजार, नाणेबाजार, बचत व गुंतवणूक, बँकिंग, शासकीय धोरणे व निर्णय, आर्थिक संक्रमणावस्था, वित्तीय विश्लेषण, धोरण विश्लेषक, आदी विषयांमध्ये प्रावीण्य संपादन करून आपले करिअर चांगले करता येते.

अर्थशास्त्रात काय आहेत संधी?

·       रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया

देशाच्या सर्वोच्च बँकेत अर्थतज्ज्ञ, संख्याशास्त्रतज्ज्ञ म्हणून अनेक जागा निघतात. अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी ५५-६०% मिळवून केलेल्या विद्यार्थ्यांना या संधी उपलब्ध असतात. रिझव्‍‌र्ह बँकेत काम करताना देशाच्या नाणेविषयक, बँकांच्या आणि एकूण आर्थिक नियंत्रण यामध्ये प्रत्यक्ष काम करता येते. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया मध्ये द्वितीय श्रेणीतील नोकरीच्याही अनेक संधी खास अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी असतात.

अर्थशास्त्र, सांख्यिकी अर्थशास्त्र, इकोनॉमिट्रिक्स, संशोधनाची आवड असणा-यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेत विद्यार्थीदशेपासूनच संधी आहेत. पदव्युत्तर पदवी करत असताना आर.बी.आय. ‘यंगस्कॉलर’ ही स्पर्धा परीक्षा देऊन थेट रिझर्व्ह बँकेच्या सेवेत पहिल्या टप्प्यावर दाखल होण्याची संधी आहे.

·       आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये संधी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, पुनर्निर्माण आणि विकासासाठीची आंतरराष्ट्रीय बँक (जागतिक बँक) यांच्याही सेवा क्षेत्रात जाण्याच्या संधी आहे.

·       इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (आय.इ.एस.)

शासनाच्या ध्येयधोरणाच्या निश्चितीमध्ये आपला सहभाग असावा, असे वाटणा-या करिअरिस्टिक विद्यार्थ्यांना इंडियन इकोनॉमिक सर्व्हिसेस (आय.इ.एस.) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संधी आहे. अतिशय प्रतिष्ठेची अशी ही परीक्षा तुम्हाला या विषयातील उच्च पदांवर सेवेची संधी देते. अर्थशास्त्रातील पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येतं.

·       बँकांमध्ये विशेष सेवा परीक्षा

सर्व बँकांमध्ये अर्थतज्ज्ञांची आवश्यकता असते. भारतातील सर्व सार्वजनिक बँकांचे विशेष सेवा भरतीसाठी अर्ज निघतात. त्यामध्ये अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतात.

·       बँकांमध्ये क्लार्क व प्रोबेशनरी ऑफिसर

राष्ट्रीयकृत बँक, इंडियन बँक असोसिएशन (IBPS), सेबी, नॅशनल हौसिंग बोर्ड, आयात-निर्यात बँक, ग्रामीण विकास बँक, लघुउद्योग विकास बँक, सहकारी बँका, पतसंस्था, यासारख्या ठिकाणी नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात.

·       स्टाफ सिलेक्शन कमिशन

स्टाफ सिलेक्शन कमिशन संख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र विद्यार्थ्यांसाठी अनेक भरती निघतात. यामध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अर्ज करता येतात.

·       प्राध्यापक / प्राध्यापिका

अर्थशास्त्र हा विषय कला, वाणिज्य, व्यवस्थापन अशा अभ्यासक्रमात शिकवला जातो. अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट-सेट, पीएच.डी. करून उच्च माध्यमिक स्तरावर, महाविद्यालयात, विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नोकरी मिळू शकते.

त्यामुळे प्राध्यापक म्हणून सर्व विद्यापीठात, कॉलेजमध्ये संधी उपलब्ध आहेत. यासाठी पदव्युत्तर पदवी करून नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

·       विविध सरकारी संस्था

अर्थशास्त्रातील पदवीधारकांना नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आदी सरकारी संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळते. महारष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय मार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पदांवर नियुक्ती मिळण्याची संधी आहे.

·       संशोधक

काही कंपन्यांमध्ये संशोधन केंद्र आहेत, त्यात संशोधक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध आहे.

अर्थशास्त्रासोबत विधी, व्यवस्थापन, पर्यावरण, उत्पादन, वित्तीय संबंध यातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका पूर्ण केली तर आणखी चांगल्या संधी उपलब्ध होतात.


No comments:

Post a Comment

महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांची प्रासंगिकता

प्रा.   योगेश भारस्कर सहाय्यक प्राध्यापक (अर्थशास्त्र) गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला , भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , सिन्न...